खानापूर मतदारसंघात दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पारंपारिक राजकीय विरोधक असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आदी मंडळी देखील इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार असल्याने इच्छुकांची महायुतीत राजकीय घुसमट सुरू होती. त्यामुळे माजी आमदार देशमुख, सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी पुण्यात शरद पवार यांच्यासमोर मुलाखत देखील दिली.
मतदारसंघात महाविकास आघाडीतून वैभव पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेनेचे सुहास भैया बाबर यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत. त्यामुळे सुहासभैया बाबर विरुद्ध वैभव पाटील लढत निश्चित समजली जाते. मतदारसंघातील हवा आतापासूनच तापलेली पाहायला मिळत आहे.
