खानापूर घाटमाथ्यावर शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी हंगामात लागवड केलेली मका जोमदार वाढली असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. अनेक वर्षे दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या घाटमाथा परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे व टेंभू योजनेचे पाणी सातत्याने अग्रणी नदी व परिसरातील तलावात सोडण्यात येते. त्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा द्राक्षे, ऊस, केळी या पिकांकडे कल वाढू लागला आहे.
दुग्धोत्पादनाकडे युवा शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. मक्याच्या वैरणीमुळे दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकाला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी आहे. कमी खर्चात व कमी कालावधीमध्ये येणारे पीक म्हणून मका पिकाची ओळख आहे. मुबलक पाणी व अनुकूल वातावरणामुळे रब्बी हंगामा केलेली मका जोमदार वाढली असून, यावर्षी मका पिकापासून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.