आठवडा बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा

हुपरी शहरात योग्य नियोजन नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा आठवडा बाजार भरत आहे. यातूनच रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. शिवाय वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाबरोबरच गाडीवरील स्पीकरचा मोठा आवाज सुध्दा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहत, साखर कारखाना व चांदी उद्योगाच्या निमित्ताने जवळच असलेल्या कर्नाटक सीमा भागातून वाढलेली वर्दळ, मोठ्या प्रमाणात होणारी ऊस वाहतूक यामुळे नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना धोका निर्माण झाला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी आठवडा बाजार योग्य ठिकाणी बसवणे गरजेचे आहे. शिवाय परिसरात वाढत्या घरफोड्या, चोऱ्या, गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास करणे, पाकीट मारी व चेन स्नेचिंग चे वाढते प्रकार यामुळे महिला भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. घरी सुरक्षित पोहोचतील याची खात्री देता येत नाही तेव्हा याबाबत संबंधित विभागाने तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा अशा वाहनांची तोडफोड झाल्यास याला प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

हुपरी शहरातील शनिवार व बुधवार आठवडा बाजार रस्त्यावर भरत आहे. याचे पोलिस प्रशासन व नगरपरिषद विभागाने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा
सामुदायिक इशारा  मनसे, शेतकरी संघटना व  शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांना  निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.