सांगोला रोडवर घडला अपघात! शाळा सुटल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दुचाकीला ट्रकची धडक शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळा सुटल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दुचाकीची मालट्रकला समोरासमोर जोराची धडक बसून भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.हा अपघात शनिवार, ३० दुपारी ४ च्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील सांगोला-वाढेगाव बायपास रोडवर घडला.

अमर भगवंत दिघे-पाटील (१७, रा. मेडशिंगी रोड, दिघे वस्ती वाढेगाव, ता. सांगोला) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाढेगाव येथील अमर दिघे-पाटील हा विद्यार्थी सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत इ. ९ वीच्या वर्गात शिकत असून तो एनसीसीचा विद्यार्थीही होता.

दरम्यान, शनिवारी दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर अमर दिघे हा स्वतःच्या एम एच-०९ डीआय-६०३० या दुचाकीवरून सांगोला ते बायपास रोडने वाढेगाव घराकडे निघाला होता. यादरम्यान, कोल्हापूरकडून बायपास रोडने पंढरपूरकडे जाणाऱ्या एम पी-१३ एच-१३९० या मालट्रकची समोरासमोर जोराची धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात अमर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने नातेवाईक बंडू दिघे यांनी त्यास रुग्णवाहिकेतून उपचार करता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.