भूकंपाच्या धक्क्यांनी भंडारा, गडचिरोली हादरलं, कुठे जाणवला प्रभाव ?

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी भूकंपाचे धक्के बसले आहे. जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोंचा यांसह अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्क बसलेत. भूकंपाचे हे धक्के जास्त मोठे नव्हते, सौम्य असले तरी त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तसेच छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम येथेही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगण राज्यातील मुलुगू हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. मुलूगू येथे जाणावलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी होती. सिरोंचा येथे गेल्या दोन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले आहे. मात्र सुदैवाने या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानि झालेली नाही.

दरम्यान आज सकाळी भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच गोंदियातील काही परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास जमीन अचानक हादरू लागली. भूकंप होत असल्याचे जाणवताच नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने भूकंपाचे धक्के जास्त तीव्र नसल्याने कोणत्या प्रकारचे नुकसान किंवा जीवित हानी झाली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गडचिरोलीसह दक्षिण भारतात आज सकाळी 7.23 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार हा भूकंप रीक्टर स्केलवर 5.3 एवढ्या मोठ्या क्षमतेचा असल्याची पुष्टी झाली आहे. संपूर्ण गोदावरी नदी खो-यात कमी-अधिक प्रमाणात असे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या दशकातला हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप असल्याची माहिती पुढे आली असून गोदावरी फॉल्टमुळे हा भूकंप झाला असल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के जाणवले तर चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागात सौम्य धक्के जाणवले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक भागांत जाणवलेल्या या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा तेलंगणमध्ये होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यात सकाळी रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे झटके हैदराबादमध्येही बसले. सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खोल होते. यामुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी संबधित अधिकारी हे या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. तर स्थानिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क रहावे तसेच गर्दीच्या जागांपासून किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

तेलंगणमध्ये बसलेला भूकंपाचा झटका थोडा तीव्र होता. अनेकांच्या त्यामुळे भीतीने थरकाप उडाला आणि ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काही काळ जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्याने खुर्च्यांवर बसलेले अनेक जण खाली पडले असा दावा करण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगु जिल्ह्यातील मेदारम परिसर असल्याचे सांगण्यात येत आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी मेदारममध्ये सुमारे एक लाख झाडे उन्मळून पडली आणि आता बरोबर चार महिन्यांनंतर याच परिसरात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.