जेव्हा आमिर खानच्या सेटवर पोहोचले होते अंडरवर्ल्डचे लोक…….

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यानं त्याच्या खासगी आयुष्याविषयी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या वेळी त्यानं एक असा किस्सा सांगितला, जेव्हा शूटिंगच्या सेटवर अंडरवर्ल्डचे काही लोक अचानक आले होते. आमिरनं सांगितलं की ते लोक त्याला एका पार्टीत बोलावण्यासाठी आले होते. तर, आमिरनं पार्टीत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता.

आमिरनं ही मुलाखत द लल्लनटॉपला दिली होती. आमिर खानला विचारलं की त्याला कधी अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती का? आमिरनं सांगितलं की त्याला अंडरवर्ल्डकडून कधी धमकी मिळाली नाही. तर आमिर खाननं सांगितलं की त्याला पार्टीसाठी आमंत्रण मिळालं होतं.

त्याने सांगितलं, ‘मला एकदा शारजाह किंवा दुबईकडच्या एखाद्या ठिकाणी पार्टीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण मी सरळ नकार दिला. नंतर काही लोक थेट माझ्या शूटिंग सेटवर आले आणि पार्टीला यायला आग्रह करू लागले.’ आमिर म्हणाला, ‘त्यांनी मला सांगितलं की तू ये, हवं तेवढं मानधन देऊ, तुझ काही काम असेल तर तेही करून देऊ, फक्त तू ये. पण, मी स्पष्ट सांगितलं की मी नाही येणार.’

पुढे आमिरनं सांगितलं, ‘जेव्हा मी वारंवार नकार दिला, तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत बदलली. ते मला म्हणाले, ‘तुला यावं लागेल कारण आधीच जाहीर केलंय की तू येणार आहेस, आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.त्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही गेल्या महिन्याभरात मला सतत भेटताय आणि मी तेवढ्याच ठामपणे नकार देतोय. मी नाही येणार. तुम्ही खूप ताकदवान आहात, मला मारू शकता, हात-पाय बांधून घेऊन जाऊ शकता, पण मी स्वतःहून येणार नाही. हे ऐकल्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्याशी संपर्कच केला नाही.’