पावसाळ्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अतिसाराच्या तक्रारी; योग्य ती काळजी कशी घ्यावी

पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शाळेत एकमेकांच्या सहवासात आल्याने विशेषत: या काळात लहान मुलांना पटकन सर्दी-खोकला, ताप, जुलाब अशा समस्या उद्भवतात. पुण्याच या आरोग्य समस्यांनी डोकं वर काढलं आहे. प्रामुख्याने 2 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारचे आजार जरी सामान्य असले तरी ते अत्यंत चिंताजनक आहेत कारण ते सहजपणे पसरतात आणि कालांतराने उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

10 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचं वाढतं प्रमाण

संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले असून हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आणि 10 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. मुलं खूप संवेदनशील असतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवत असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

पावसाळा अनेकदा नेहमीच्या सर्दी आणि तापापेक्षाही अधिक आजार घेऊन येतो. गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जलजन्य आजार तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे डासांमुळे होणारे आजार हे साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे वाढतात. या काळात त्वचेचे संक्रमण, पुरळ उठणे, बुरशीजन्य संसर्ग आणि ब्राँकायटिस आणि न्यूमोनियासारख्या श्वसन समस्या देखील झपाट्याने वाढतात.

प्रतिबंधात्मक उपाय

पालकांना प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक करणे आवश्यक आहे. उकळून थंड केलेले पाणी पिणे, उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, सॅनिटायझर्स आणि जंतुनाशकांचा वापर करुन स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेणे आणि बदलत्या हवामानानुसार मुलांचे शरीर पुर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालणे यामुळे संसर्गापासूम दूर राहण्यास मदत होते. डास प्रतिबंधकांचा वापर करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे आणि घराभोवती साचलेले पाणी रोखणे हे देखील महत्त्वाचे असे प्रतिबंधात्मक उपाय आहेत .