इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय त्याचबरोबर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच जास्तीत जास्त आघाडीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी समित्यांची स्थापनाही केली आहे. मात्र, महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट होत असताना दुसरीकडे महायुती घटक पक्षांना एकत्र घेऊन लढणार की स्वबळावर लढणार यावर चर्चा सुरु आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरु आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. आगामी निवडणूक ही चार नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे. त्याचा निश्चित फायदा पक्ष आघाडींना होणार आहे. त्यानुसार विविध पक्ष व आघाडी आत्तापासून तयारीला लागले आहेत. शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (उबाठा), माकप,मँचेस्टर आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी आदी पक्ष व आघाडी मिळून महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राजकीय हालचालींना सुरूवात केली आहे. त्यामध्ये आघाडीच्या घटक पक्षांची एकत्रीतरित्या बैठक होत आहे. उमेदवार चाचपणीसाठी आघाडीने समितीची स्थापना केली आहे. त्याद्वारे उमेदवार चाचपणीचे काम सुरू केले आहे.
महाविकास आघाडीची आजची स्थिती पाहता त्यांची वज्रमूठ घट्ट होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला टक्कर देणाऱ्या महायुतीचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा हा स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे. भाजपातील अनेक नेतेमंडळी स्वबळावर लढण्याची मागणी करत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट देखील पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे तर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यामध्ये ठेवली आहे.
एकंदरीत सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीची वाटचाल चांगल्या पध्दतीने चाललेली दिसत आहे. तसेच समविचारी मंडळींना आघाडीत येण्याची इच्छा असेल त्यांना आघाडीचे दार केव्हाही उघडे असेल असे आघाडीच्या नेत्यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे भविष्यात आघाडीमध्ये आणखी कोण-कोण दाखल होणार हे पाहावे लागेल.
