शहरातील जुना धान्य बाजार परिसरात, सध्या नवीन व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू आहे, परंतु पाया खोदत असताना सुमारे १५ ते २० फूट खाली एक चौकोनी आकाराचे दगडी बांधकामाचे व पश्चिम बाजूस पूर्व पश्चिम तटबंदीची भिंत आढळून आली आहे.
सांगोला (Sangola) शहराला ऐतिहासिक वारसा असून याठिकाणी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याची लष्करीदृष्टीने महत्वाचे लष्करी ठाणे म्हणून ओळख होती. आजही शहरात भुईकोट किल्ल्याचे पुरातन बुरुज व तटबंदी आढळून येतात. पूर्वी ज्याला खंदक परिसर म्हणून ओळखले जात होते, त्या परिसरात अलीकडच्या काळात व्यापारी दुकाने वाढली. जुना धान्य परिसर व खंदक भागात सांगोला नगरपरिषदकडून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. याच बांधकामाचे पाया खोदत असताना, पूर्व बाजूस आयताकृती दगडी बांधकाम असणारे अवशेष तर त्यांच्या पश्चिम बाजूस पूर्व – पश्चिम अशी मोठी तटबंदी आढळून आली, यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अवशेष असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी, पायात सापडलेले बांधकाम नेमके काय आहे, हे पाहण्यासाठी येत होते. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सांगोला शहरातील हे सापडलेले अवशेष नक्की काय आहेत, यांचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाने भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुहास गवळी यांनी या ठिकाणी भेट दिली. दरम्यान, पुरातन बांधकामाचे अवशेष सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर, पुणे येथील पुरातत्व विभागाकडून दखल घेण्यात आली असून लवकरच स्थळ पाहणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
