स्थानिक निवडणुकांमध्ये पालकमंत्री निर्णायक

सोलापूर जिल्ह्यातील कोणाला मंत्रिपद मिळणार यापेक्षा पालकमंत्री कोण होणार? याचीच सर्वांना उत्सुकता आहे. विशेषत: महसूल, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे त्याकडे आवर्जुन लक्ष आहे. कामकाजात प्रत्येकवेळी हस्तक्षेप न करणारा व मोकळ्या मनाने काम करू देणारा पालकमंत्री असावा अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. तत्पूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करताना आपल्याला पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली संधी मिळेल, या आशेने सर्वांनीच काम केले. त्या सर्वांची संघटनात्मक बांधणी करून पक्षाला सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून देण्यासाठी सोलापूरला स्थानिक पालकमंत्री आवश्यक आहे.

सध्या खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे आपल्या नेतृत्वात माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस येथील आमदारांच्या मदतीने मिनी मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकाविण्याचे नियोजन करीत आहेत. तर खासदार प्रणिती शिंदेही महापालिका काबिज करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी भाजपने स्थानिक पालकमंत्री दिल्यास निश्चितपणे महायुतीला मोठे यश मिळू शकते, असेही बोलले जात आहे.