यंदाच्या ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.कागल, हुपरी, इचलकरंजी, हमीदवाडा, बेलेवाडी मासा, कर्नाटक सीमाभाग आणि कोल्हापूर येथील अनेक साखर कारखान्यांकडे जाणारी वाहतूक कसबा सांगाव परिसरातून सुरू असते. छकडा, बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रक यातून दिवस-रात्र ऊस वाहतूक केली जाते. वाहतुकीदरम्यान अनेक वाहनचालक मोठ्या आणि कर्कश आवाजात गाणी लावून वाहने चालवत असतात.
अनेक वाहनांतून जादा वजनाची ऊस वाहतूक सुरू असते. वेग मर्यादाही पाळली जात नाही. वाहनांच्या मागील बाजूला रिफ्लेक्टर लावले जात नाहीत. बहुतांशी वेळेस रस्त्याच्या कडेलाच अनेक वाहने उभी केली जातात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. रात्री अपरात्री अनेक वाहनचालक मोठी गाणी लावून वाहने चालवतात. यामुळे परिसरात नागरिक, पादचारी आणि अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.
वाहनांमध्ये जास्त ऊस भरल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कारखाना आणि पोलिस प्रशासनाकडून योग्य निर्बंध घालण्याची गरज आहे. मोठ्या आवाजात लावलेली गाणी, वेग मर्यादेचे उल्लंघन आणि प्रमाणापेक्षा जादा उसाची वाहतूक आदी गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.