अनेक भागात सध्या भरपूर प्रमाणात अतिक्रमण वाढलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीला खूपच अडथळा निर्माण होत आहे. वेळोवेळी नागरिकांमधून नाराजीचा सूर देखील पहायला मिळत आहे. इचलकरंजी- हातकणंगले मार्गावरील पंचगंगा साखर कारखान्याच्या भिंतीलगत असणारे अतिक्रमणांमुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी होऊ लागल्यामुळे ही अतिक्रमणं हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा बजावूनही दखल न घेतल्यामुळे कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांच्याकडून गुरुवारी दुकानासमोर उभारलेल्या छपऱ्या काढून घेण्यात आल्या. पण खोकी हलविण्याबाबत हालचाली दिसून न आल्यामुळे शुक्रवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना सक्त सूचना केल्यानंतर दुपारनंतर नुकसान टाळण्यासाठी दुकानगाळ्यांमधील साहित्याची बांधाबांध सुरु केल्याचे पहायला मिळाले. सोमवारपर्यंत साहित्य हलविल्यानंतर खोकी हटविण्यात येणार असल्याचे समजते.