इचलकरंजी येथे लाईट सुरु ठेवला म्हणून पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; पतीस अटक

इचलकरंजी जवाहरनगरातील शास्त्री सोसायटीत शेटके दाम्पत्य राहण्यास आहेत. २ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपेतून जागे झालेल्या पती गजानन शेटके यांनी दारातील लाईट का सुरु ठेवलीस असे म्हणत शिवीगाळ करत कुऱ्हाड हातात घेतली. ते पाहून शांता यांनी हातातील कुऱ्हाड काढून घेत ती पलंगाखाली सारली. त्यावेळी पती गजानन यांनी ढकलून दिल्याने खाली पडलेल्या शांता यांच्या उजव्या डोळ्याला खुर्ची लागली. त्याचवेळी गजानन यांनी स्वयंपाक घरातील चाकू घेऊन शांता यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला.

हल्ल्यानंतर शांता या घराबाहेर जात असतानाच गजानन यांनी कुऱ्हाड घेऊन त्याच्या लाकडी दांड्याने डोक्यात मारले. यामध्ये शांता या जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून गजानन यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गजानन शेटके यांस न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.