कबनूर येथील काही भाग तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेकडे समाविष्ट झाल्याने कबनूर ग्रामपंचायतीकडील कर्मचाऱ्यांना इचलकरंजी महापालिका सेवेत वर्ग करावे; अन्यथा महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा श्रमिक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. आप्पा पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने प्रभारी सहायक आयुक्त विजय राजापुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कबनूरमधील काही भाग २०१४ मध्ये तत्कालीन इचलकरंजी नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार त्या प्रमाणात कर्मचारी समाविष्ट करून घेणे गरजेचे होते. शासनस्तरावरून वारंवार सूचना व आदेश महापालिकेला मिळाले आहेत. तथापि, काही तांत्रिक त्रुटी उपस्थित करून आजतागायत एकाही कर्मचाऱ्याला वर्ग केलेले नाही. या कर्मचाऱ्यांचे समावेशन होणार म्हणून जिल्हा परिषदेकडेही समावेशन झालेले नाही. केवळ तांत्रिक त्रुटी काढून हा विषय प्रलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे नुकसान झालेले आहे. हा विषय प्रलंबित राहिल्यास हे सर्व कर्मचारी सेवानिवृत्त होतील. आयुष्यभर तुटपंजा पगारावर नोकरी करून सुद्धा शासकीय सेवेचा योग्य तो लाभ मिळणार नाही.
यातील सर्व कर्मचारी मागासवर्गीय समाजातील असून त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून या कर्मचाऱ्यांना तत्काळ महापालिकेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अन्यथा हे सर्व कर्मचारी कुटुंबासह महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, आत्मदहन करतील. निवेदनावर श्रमिक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. आप्पा पाटील यांची स्वाक्षरी आहे.
