उत्तमराव, माझ्या परवानगीशिवाय आमदारकीचा राजीनामा देऊ नका; जयंत पाटलांची सक्त ताकीद

मारकडवाडीच्या जनतेचा लढा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी हातात घेतल्याने त्यांचे कौतुक आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय आमदारकीचा राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक झाली तरी तुम्हीच निवडून येणार आहात, याबाबत माझ्या मनात शंका नाही.पण, माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, असे सरकारने सांगितले, तरच आपण राजीनामा देऊ, अशी ताकीद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार उत्तम जानकर यांना दिली.

जयंत पाटील म्हणाले, अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद साधतील. पण, तुम्ही जो ठामपणा दाखवला आहे. तुमची मतं मांडायला तुम्ही या ठिकाणी आला आहात. जेवढी मतं उत्तम जानकर यांना मिळाली आहेत, त्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम जानकर यांनी हा लढा हातात घेतल्याने त्यांचे कौतुक आहे.

निवडून आलेले सरकारच्या बाजूचे काही आमदार खासगी सांगतात की, निवडून आलो ठीक आहे. पण, एवढी मतं कशी काय पडली आहेत, सरकारच्या बाजूच्या आमदारांनाच असे आर्श्चय वाटतंय. त्यामुळे कोणाचा प्रभाव आहे, हे एकदा कळलं पाहिजे. सत्तेत बसलेल्या माणसालाही जनता आपल्या मागे आहे, असा विश्वास असायला हवा, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.