पेठवडगाव येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून वीस लाखांचा ऐवज लांबवला. ही घटना काल, रविवारी सकाळी वाजता उघडकीस आली. याप्रकरणी घरमालक सचिन कदम व बाबासाहेब पाटील यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत वडगाव-कोल्हापूर रस्त्यावर गणेश मंदिरासमोरील सचिन दत्तात्रय कदम यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरातील वीस तोळे सोन्याचे दागिने, दोन लाख रोख रक्कम असा सुमारे १८ लाखांचा ऐवज अनोखळी चोरट्यांनी लांबवला. श्री. कदम हे नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी ते शुक्रवारी (ता. ६) दुपारी घराला कुलूप लावून सहकुटुंब पुणे येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या समोरील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
आतील तिजोरीचे दार कटावणीने उचकटले व त्यातील लॉकर तोडला.लॉकरमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरली. यात दोन नेकलेस, कोल्हापुरी साज, सोनसाखळी, दोन मोठ्या अंगठ्या, आठ लहान अंगठ्या, मोहन माळ असे सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने व सुमन कदम यांनी निवृत्ती वेतनाचे काढून आणलेले दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले.
याच पद्धतीने दत्तनगर येथील बाबासाहेब नामदेव पाटील यांच्या बंद घराचेही कुलूप तोडण्यात आले. तेथील तिजोरीतील चार ग्रॅम अंगठी, सोन्याचे मनी व १७ हजारांची रोख रक्कम असा पाऊणलाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
बाबासाहेब पाटील हे कुटुंबीयासह शाहूवाडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केली. यावेळी त्यांनी शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या.दरम्यान, घटनास्थळी वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडक यांच्या पथकाने भेट दिली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलवण्यात आले होते. त्यांनी चोरांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला. या दोन्हा घटनांची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.