भंडारा जिल्ह्यातील साकोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 19 वर्षीय नर्सिंगच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात तिने स्पष्ट केलं आहे की, “मी स्वतः आत्महत्या करतेय, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.” ही घटना भंडाऱ्याच्या साकोली येथील पंचशील वार्डात घडली.
मृत नर्सिंग विद्यार्थिनीचं नाव प्रेरणा खोब्रागडे (१९) असं आहे. ती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पंचवटी गावची रहिवासी असून सध्या साकोली येथील मामाकडे राहून नर्सिंग महाविद्यालयात प्रशिक्षण घेत होती. तिने गळफास घेऊन आयुष्य संपविल्यानं कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी असताना केलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुसाईड नोटमध्ये मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका असं नमूद करण्यात आलं असलं तरी, तिने आत्महत्येसारखी टोकाची पावलं का उचलली यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
