सांगोल्यात महायुतीत बिघाडी!विधानसभेला आमदार शहाजीबापूंच्या वाढणार अडचणी….

सोलापूरच्या सांगोल्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.त्यामुळे आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या निमित्ताने दीपक साळुंखे यांनी मतदारसंघात गावभेट दौरा करून लोकांची मतं ही जाणून घेतली आहेत. अलिकडेच कोलकत्ता आणि मुंबई येथील‌ गलाई कमगारांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले आहे. महिला मेळावा घेऊन मतदार संघात वातावरण निर्मिती केली आहे. साळुंखे यांची तयारी पाहता महायुतीत बिघाडी होण्याची अधिक शक्यता आहे. साळुंखे यांची उमेदवारी कायम राहिली तर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार शहाजी पाटील दीपक साळुंखे यांची बंडाळी कशी थोपवू शकतात यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. साळुंखे यांनी बंडाळी केली, तर आमदार शहाजी पाटील यंदा गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीमध्ये सांगोल्याची जागा शिवसेनेकडे आहे. येथून पुन्हा शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. मागील सहा महिन्यांपासून दीपक साळुंखे यांनी मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.