दिसण्यावरून उडवली दिग्दर्शकाची खिल्ली? टीकेनंतर कपिलने सोडलं मौन

गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन कपिल शर्मावर जोरदार टीका होत आहे. दिग्दर्शक अटलीच्या दिसण्यावरून त्याने केलेल्या टिप्पणीमुळे नेटकरी आणि अनेक सेलिब्रिटीसुद्धा त्याच्यावर नाराज आहेत. आता यावर खुद्द कपिलने उत्तर दिलं आहे. अटलीवर केलेल्या कमेंटबद्दल माफी न मागता कपिलने थेट नेटकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. त्याचसोबत त्याने लोकांना कोणतंही मत बनवण्यापूर्वी संपूर्ण एपिसोड बघण्याची विनंती केली आहे. शनिवारच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एपिसोडमध्ये ‘बेबी जॉन’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक अटलीसुद्धा इतर कलाकारांसोबत उपस्थित होता. यावेळी कपिलने त्याच्यावर जी कमेंट केली, ती वर्णद्वेषी असल्याची टीका नेटकरी करत आहेत.

या एपिसोडमध्ये कपिल अटलीला मस्करीत विचारतो, “तू इतका तरुण आणि इतका मोठा दिग्दर्शक-निर्माता आहेस. पण जेव्हा तू सेलिब्रिटींना पहिल्यांदा भेटतोस, तेव्हा ते असं विचारतात का, अटली कुठे आहे?” त्यावर अटली उत्तर देतो, “मला तुझा प्रश्न समजला. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी ए. आर. मुरुगादोस सरांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी माझी स्क्रिप्ट वाचली, पण मी कसा दिसतो याकडे पाहिलं नाही किंवा मी त्या पात्रतेचा आहे की नाही याकडेही लक्ष दिलं नाही. पण त्यांना माझी कथा आवडली. मला असं वाटतं की जगाने ही गोष्ट पहायला हवी. आपण एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या प्रतिभेचं मूल्यमापन नाही केलं पाहिजे. दिसण्यावरून मतं नाही बनवली तर उत्तम. तुम्ही लोकांच्या मनावरून त्यांच्याबद्दल मत बनवा.”

मंगळवारी कपिल शर्माने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एका युजरला प्रतिप्रश्न केला. ‘कपिल शर्माने अटलीच्या दिसण्याची खिल्ली उडवली? अटलीने एखाद्या बॉसप्रमाणे त्याला उत्तर दिलं’, अशा आशयाची एका नेटकऱ्याची पोस्ट होती. त्यावर कपिलने लिहिलं, ‘प्रिय सर, या व्हिडीओमध्ये मी कधी आणि कुठे त्याच्या दिसण्याबद्दल बोललो हे तुम्ही मला स्पष्ट करू शकता का? कृपया सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका. धन्यवाद!’ या एपिसोडबाबत नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असताना कपिलने पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली आहे.