शेकापच्या प्रतिनिधित्वाची धुरा बाबासाहेबांवर…..

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात दोघा मातब्बर उमेदवारांना चितपट करून मोठ्या मताधिक्याने सांगोला मतदारसंघावर पुन्हा एकदा लालबावटा फडकवला आहे. बाबासाहेब यांना मानणारा मोठा वर्ग या भागात तयार झालेला आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू असलेल्या आमदार बाबासाहेब देशमुख यांनी निवडून येताच झपाटून कामाला सुरुवात केलेली आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेल्या संकल्पना या मतदारसंघाला विकासाकडे घेऊन जाणारी ठरेल असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राज्यात डॉ. बाबासाहेब देशमुख हे एकमेव उमेदवार शेकापकडून निवडून आल्याने त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार विधिमंडळात भूमिका मांडण्याची मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे.

विधानसभेत तसेच विविध अधिवेशनांमध्ये पक्षाच्या वतीने भूमिका मांडायला दुसरा कोणीच उमेदवार नसल्याने आमदार बाबासाहेब देशमुख यांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या विकासात्मक राजकारणाचा वारसा असल्याने आणि उच्चशिक्षित असल्याने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे ती जबाबदारी ताकदीने पार पडतील असा विश्वास शेकापच्या नेतेमंडळींना वाटतो.