वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये कामगार वस्ती असल्याने तत्कालीन नगरपालिकेतील कारभाऱ्यांनी येथील जनतेला माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने आयजीएमची उभारणी केली. कालांतराने येथील सेवा सुविधा पुरविण्याचा खर्च पालिकेच्या आवाक्याबाहेर गेल्याने तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांनी पुढाकार घेऊन इस्पितळ राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले. तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आयजीएमसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी आणत 3000 बेड साठी मंजुरी मिळवली. येथे सध्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र त्यांची वेळच्यावेळी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागातील आयसीयू अचानक वातानुकूलित यंत्रणा एसी बंद पडली. विभागातील नर्सिंग स्टाफ व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने येथे उपचार घेत असलेल्या 14 रुग्णांना जुन्या अतिदक्षता विभागात स्थलांतरित केल्याने पुढील अनर्थ टळला. मोटर जळल्याने एसी बंद पडला असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च येणार आहे. मात्र इतका निधीत प्रशासनाकडे नसल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना अतिशय गंभीर आहे. यासाठी आता निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आयजीएम सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार आहे. येथील सेवा सुविधा यांच्यासाठी हेळसांड होऊ नये यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी लक्ष देण्याची गरज सध्या व्यक्त होत आहे.