पंचगंगेत दुर्गंधीयुक्त काळे पाणी; महापालिकेचे दुर्लक्ष

पंचगंगा घाटावर गेली तीन दिवस दुर्गंधीयुक्त काळे पाणी असल्याने रोज पोहायला येणाऱ्यांनी नदीकडे पाठ फिरवली आहे. पावसानंतर तर सकाळी पंचगंगा घाटावर प्लास्टिक कचऱ्याचा अक्षरशः खच साठून राहिला. दरम्यान, महापालिकेने घाट मार्गावरील काही ठिकाणाचा कचरा काढला. मात्र, नदीपात्रातील पाणी तसेच पुढे प्रवाहित होत राहिले. पंचगंगा परिसरातील काही नाले आणि दुधाळीकडून येणाऱ्या ओढ्यामधून सांडपाणी नदीत मिसळते, अशा तक्रारी वारंवार होतात. मात्र, प्रशासनाने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. एकीकडे पंचगंगा घाट संवर्धनाचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी निधी खर्च होत आहे. पण, पंचगंगेचे मूळ दुखणे कायम असून, त्याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.