सांगली येथील मधवर्ती बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून दररोज एक ना एक चोरी होतेच. आजही पुण्यातील एका दाम्पत्याकडील पैशांची पर्स महिला चोरट्यांनी लांबविली.यापूर्वीही अनेक तक्रारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहे. मात्र, त्यातील अपवाद वगळता चोरटे पोलिसांच्या हातीच लागत नाहीत. त्यामुळे प्रवाशी पुरते वैतागले आहेत.
सांगली बसस्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटले जात आहे. आज पुण्याचे दाम्पत्य नृसिंहवाडीला निघाले होते. ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकीट लांबविले. त्यात सात ते आठ हजार रुपये, एटीएम कार्ड, आधारकार्ड होते. पाकीट चोरीची बाब लक्षात येताच दाम्पत्याने शोध घेतला. अखेर सायंकाळी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
