शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान, पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जात आहे. खरे तर, शेतीसाठी जमीन, पाणी आणि वीज हे तीन घटक फारच महत्त्वाचे ठरतात. मात्र, आजही भारतातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळतं नाही. महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर फरक पडतो. हजारो, लाखो रुपयांचा खर्च करूनही आणि पाणी असूनही अनेकदा शेतकऱ्यांची पिके जळून खाक होतात. कारण ठरते विजेचे. मात्र आता शेतकऱ्यांची ही अडचण कायमची दूर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पीएम कुसुम योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी तब्बल 90% एवढी अनुदान दिले जात आहे.

म्हणजे, शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध होते आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीएम कुसुम योजनेचा फायदा काय होणार?

शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार असून दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना खर्च करावी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या 17.5 लाख पंपांचे आधुनिकीकरण करून त्यांचे सौर पंपांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

म्हणजेच जे शेतकरी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे सिंचन पंप वापरत होते त्यांना आता सौरऊर्जेच्या मदतीने पंप चालवता येणार आहेत. यामुळे त्यांना इंधन आणि वीज बिलाच्या खर्चातून मुक्तता मिळेल आणि मोफत विजेचा लाभ मिळेल.

अर्ज कसा करणार ?

पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. pmkusum.mnre.gov.in ही या योजनेची अधिकृत साईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यातून तुम्ही स्टेट पोर्टल लिंकवर क्लिक करा आणि तुमचे राज्य निवडा.

तुम्ही राज्य या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये सोलर पंप सबसिडी योजनेचा अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. यानंतर सबमिट पर्याय दिसेल, सबमिट करा आणि पावती प्रिंट करा. अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला सौर कृषी पंप बसवायचा आहे त्या जमिनीची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि मग तुम्हाला तुमच्या हिश्याची रक्कम भरावी लागणार आणि अशा तऱ्हेने सौर कृषी पंप तुमच्या शेतात इन्स्टॉल होणार आहे.