आई-वडिलांचे स्मरण करत आमदार सुहास बाबर यांनी घेतली शपथ

खानापूर-आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव केला व पहिल्याच प्रयत्नात त्यांना आमदारकी मिळविण्यात यश आले. विधान भवन मुंबई येथे आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सुहास बाबर यांच्यासह शिंदेसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी रविवारी मुंबई विधानभवनमध्ये आमदारपदाची गोपनीयतेची शपथ घेतली. सुहास बाबर यांनी शपथ घेत असताना सुरुवातीस वडील अनिल बाबर व आई शाेभाकाकी बाबर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. सुहास यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केले. शपथ घेताना ते म्हणाले की, विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने मी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन अशी त्यांनी शपथ घेतली.