होटगी रोड येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्यापही या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाली नाही.उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग सरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.सोलापूर येथील होटगी रोड विमानतळाचे अधिकृत उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने केले होते.
त्यानंतर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक काळात सोलापूर दौऱ्यावर असताना २३ डिसेंबरपासून सोलापूर- मुंबई व सोलापूर-गोवा या मार्गावर नागरी विमान वाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. विमानसेवेचा प्रारंभ होण्याचा मुहूर्त अवघ्या १४ दिवसांवर येऊन ठेपला तरीही अद्याप या दोन्ही मार्गाचे तिकीट बुकिंग सुरू झालेले नाही. गोवा किंवा मुंबई येथे प्रवास करणाऱ्यांना किमान पंधरा दिवस अगोदर नियोजन करणे आवश्यक आहे.
मात्र विमानसेवा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊन अजूनही तिकीट विक्री सुरू नसल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.