माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण सांगोला व्हावे असंख्य माणदेशींची मागणी

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखीचा आहेच कारण या भागात पाण्याची टंचाई जाणवते. या भागात डाळींब शेती पहायला मिळते. परदेशात येथील डाळींब पोहचली जातात. महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यात आणखी नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून पुढे येत आहे. या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा समावेश करून नवीन माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे म्हटले गेले आहे. नवीन २१ जिल्ह्यां बरोबरच माणदेश जिल्हा होत असल्याचा माणदेशींना मोठा आनंद होत आहे. या माणदेश जिल्हा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर शतकापासून उपेक्षित, वंचित, मागास ठेवल्या गेलेल्या सांगोला तालुक्यातले सांगोला शहर, माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण म्हणून घोषीत झाले पाहिजे, अशी असंख्य माणदेशींची मागणी आहे.

लवकरच होऊ घातलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण सांगोला व्हावे, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे. या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील साहित्यिक व विविध पदाधिकारी वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याची चर्चा आहे.माणदेशातल्या आठ तालुक्यातल्या सांगोला तालुक्याला मोठा ऐतिहासीक, साहित्यीक, सांस्कृतीक वारसा लाभला आहे. सांगोला हे शहर रत्नागिरी नागपूर, इंदापूर विजापूर, सांगोला पंढरपूर या महामार्गावर असून दळणवळणाची सर्व सोय उपलब्ध आहे.
त्याचबरोबर सांगोला हे रेल्वे स्टेशन ही आहे. भव्य असे बसस्थानक ही आहे. येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी डाळिंब हे पीक घेऊन देशामध्ये नाव मिळवले आहे. भारतात सर्वात प्रभावी ठरणाऱ्या पशुधनामध्ये खिलार जनावरांचे निर्मितीस्थान असणाऱ्या सांगोला तालुक्यातील व माणदेशातील खिलार जनावरांची, देशातील शेती आणि दुध – दुभत्यासाठी मोठी मागणी आहे. इतकेच नव्हे तर तालुक्यातील शेळ्या – मेंढ्या वर्गातील या लहान जनावरांच्या दुध, मांस, कातड्याची जगभरात मोठी मागणी आहे. सांगोल्यात रविवारी भरणारा खिलार जनावरे शेळ्या, मेंढ्या, बोकडे, बकरे, पाटी, लाव्हरांचा बाजार, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो आहे. उष्णतेची घनता असणाऱ्या सांगोला तालुक्यात सौर उर्जा प्रकल्पाला प्रचंड वाव आहे.

तालुक्यातल्या असंख्य डोंगरांवर पवन उर्जेच्या पवन चक्क्या उभारणीस पोषक स्थिती आहे. डाळींब, द्राक्ष, व इतर फळ फळांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी येथे उत्तमरित्या चालु शकते. तालुक्यासह, माणदेशात सुत, कापड, निर्मिती व्यवसायाला मोठी संधी आहे. याशिवाय हजारो एकरात हजारो कोटी रुपये गुंतवणूकीची मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात सांगोला शहरालगत तसेच तालुक्यात अन्यत्र मोठी पोषक स्थिती आहे.

दुष्काळी तालुक्यांचा सांगोला जिल्हा व्हावा, ही मागणी प्रथमतः सांगोला तालुक्याचे जेष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांनी केली होती. माणदेशातील अनेक व्यासपीठावरून माणदेश जिल्ह्याच्या मागणीचा वेळोवेळी आवाज उठत आला आहे. १९८९ ते ९३ साला दरम्यान झालेल्या माणदेश ज्ञानपीठच्या दहिवडी, सांगोला येथील साहित्य संमेलनातही या मागणीला पुढे रेटण्यात आले होते.

सांगोला साहित्य संमेलनात, माणदेश जिल्हाची ही मागणी जोरात लावून धरली होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, आणि सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा माणदेशात समावेश होतो. या माणदेशी आठ तालुक्यात सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगोला शहरच ठरू शकते. सांगोला शहर मान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दळणवळणाशी जोडणारा जिल्हा होऊ शकतो.