वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा जगजाहीर आहेच. माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्या संकल्पनेतून शहरासाठी सुळकुड पाणी योजनेचा आराखडा तयार झाला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजनेसाठी 162 कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता. यामुळे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटणार अशी आशा निर्माण झालेल्या होत्या.
शहरवासीयांना पुरेसे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार अशी भावना लोकांच्या मनात तयार झालेली होती. परंतु या योजनेमध्ये राजकारण शिरल्यामुळे दूधगंगा काठावरील गावांनी विरोध करण्यास सुरुवात केली. या विरोधात इचलकरंजीत संतप्त भावना उमटल्या.कृती समिती स्थापन करून योजनेचा लढा सुरू झाला. मात्र या लढ्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाले नाही. इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा नेत्यांना हळूहळू विसर पडू लागलेला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही यामुळे निवडणुका संपल्या विषय संपला अशी या योजनेची अवस्था होऊ लागलेली आहे.