विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला. विधानसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला अजून एक धक्का बसला असून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे.
सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून तिकीट वाटप केल्याने सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे राजीनामा देत असल्याचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे पक्षाला कळवले आहे.
विशेष म्हणजे नाना पटोले माळशिरस तालुक्यात येऊनही जिल्हाध्यक्षांची भेट झाली नाही. नाना पटोलेंच्या सोलापूर दौऱ्याच्या दिवशीच धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला.