इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून परिचित आहे. वस्त्रोद्योगातील सर्वच कामगार वर्गाला बोनस दिला जातो. परिसरात खरेदीला माठे उधाण येत असते. दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असते. यंदा दिवाळी सणाला सुरुवात होण्यासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. तर दिवाळीतील महत्त्वाचा सण लक्ष्मी पूजन शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी विविध स्टॉल मुख्य रस्त्यासह विविध चौकात, भागामध्ये उभारण्यात आले आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरवासियासह ग्रामीण भाग सीमाभागातून नागरिक मोठ्या संख्येने येवू लागल्याने बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.इचलकरंजी शहरास सर्वच उत्सव, सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरे केले जातात. त्यामध्ये दिवाळी सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा गांधी पुतळा ते श्री शिवतीर्थ पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आकाशदिव, रांगोळी, कपडे, सजावटीचे साहित्य, किल्ले, मावळे आदी साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध चौकासह विविध लहान-मोठे दुकाने सजविण्यात आली आहेत. दिवाळी खरेदीसाठी शहर परिसरातील ग्रामीण भाग तसेच सीमाभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असून बाजारपेठ फुलू लागली असून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत कामगारांच्या हातात बोनसची रक्कम मिळाल्यानंतर खरेदीला उधाण येईल, असे बोलले जात आहे.