मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रातून तुम्ही वाळू का ओढता याबाबत विचारणा केल्याने येथील कोतवाल संजय राजाराम कुरवडे (४२, रा. माचणूर) यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी रोहित गवळी-भोसले (रा.भालेवाडी), ऋषिकेश सुरेश पवार (रा.अर्धनारी) या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संजय कुरवडे हे माचणूर सजेत कोतवाल पदावर कार्यरत आहेत. दि.६ डिसेंबर रोजी पहाटे १.४५ वा. भीमा नदीपात्रात वरील दोघे वाहन घेऊन वाळू भरण्यास आल्याची कुणकुण लागताच फिर्यादी नदीपात्राकडे जात असताना रस्त्यात वाळू का ओढता, असे विचारल्यावर त्या दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सध्या जिल्ह्यात वाळूचा लिलाव कोठेही झाला नसल्याने वाळू चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवेढ्यात दोन वाळूची वाहने पोलिसांनी पकडली. एका वाहनावर गुन्हा दाखल केला असून, दुसरा वाळूचा टिपर पोलिस स्टेशनच्या मैदानात सोमवारी सकाळी १० वा. लावला होता.
याबाबत पोलिसांकडे अधिक चौकशी केली असता पावती दाखवल्याने तो सोडून दिल्याचे सांगण्यात आले. शासकीय मालमत्तेची चोरी रोखणे हे महसूल व पोलिस प्रशासनाचे कर्तव्य असून, याला अटकाव घालावा, अशी मागणी होत आहे. वाळूमाफियांच्या धमकीमुळे कोतवालांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.