इस्लामपूर येथे चार लाखांचे चोरीचे मोबाईल हस्तगत; ४१ मोबाईल मूळ मालकांना केले परत

तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील; तसेच बाहेरील ठिकाणी चोरीला गेलेले मोबाईल इस्लामपूर पोलिसांनी परत मिळवण्यात यश संपादन केले आहे. सुमारे चार लाख १० हजार रुपयांचे ४१ मोबाईल पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत दिले आहेत.पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे यश मिळाले.

मागील महिन्यात किरण नारायण बिरजे (वय ४२, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती, त्यानुसार पोलिसांनी हा शोध घेतला. इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे.

जिल्हा तसेच वाळवा तालुक्यातील अनेक नागरिक याठिकाणी विविध कामानिमित्त येत असतात. अलीकडच्या काळात मोबाईल चोरीच्या तक्रारीही वाढल्या होत्या. बाजारपेठ, बस स्थानक, प्रवास या गर्दीच्या ठिकाणी हे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी पाठपुरावा करून पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले आणि मूळ मालकांना फोन परत दिले, त्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.