विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात सध्या जोरजोरात वाजू लागले आहेत. सर्वच इच्छूक कामाला लागले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
निवडणुकीतील विजयानंतर दुसऱ्याच वर्षी जयंत पाटील हे पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतात. विरोधकांमधील वजीर हेरून तो मैदानात कसे उतरेल आणि लढाईच्या तयारीत असलेल्या राजाला चेकमेट करत विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटवतात. सध्याही तशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटते, यावरच महायुतीचा उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे गेली पाच वर्षे निवडणुकीची तयारी करीत आहेत. संघटना वाढविण्यासाठी भाजपनेही त्यांना प्रोत्साहन दिले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचा दावा करत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत आणि राहुल महाडिक यांचे त्यांना उघडपणे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये इस्लामपूर मतदासंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे.
मात्र, राष्ट्रवादीने काहीशी मवाळ भूमिका घेत सर्वसहमतीने जो उमेदवार असेल, तो आम्हाला मान्य आहे, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे इस्लामपूरच्या उमेदवारीसाठी शिंदे गट आणि भाजपमध्येच स्पर्धा रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
भाजपचे निशिकांत पाटील यांची उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरमधील एका कार्यक्रमात जाहीर केली होती. त्यानंतर मात्र आनंदराव पवार आणि हुतात्मा उद्योग समुहाचे गौरव नायकवडी हेही आमदारकीसाठी इच्छूक आहेत.इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार दिला तर तगडी फाईट होऊ शकते, अन्यथा डिपॉझिट वाचविणेही अवघड होऊन जाते. त्यामुळे इस्लापूरमध्ये दुरंगी लढत होते की तिरंगी हे पाहावे लागेल.