अंबिका उद्यान उद्घाटनापासूनच बंद! नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

सत्ताधारी राष्ट्रवादीने इस्लामपूर शहरातील विकासाला गती देत असताना अंबिका देवालय परिसरातील असलेले उद्यान विकसित केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभे केले. सिनेस्टार रिंकू राजगुरु यांच्या हस्ते आणि तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधीचा खर्च केला. त्याच वेळी संगीत कारंजाचे प्रदर्शनही करण्यात प्रारंभीच्या टप्प्यात उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. शहर आणि ग्रामीण भागातून मुलांच्या सहली येत होत्या.

इस्लामपूर शहरातील नामवंत असलेल्या अंबिका उद्यानाला घरघर लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही उद्यानातील लहान मुलांची खेळण्याची साधने बंद अवस्थेत आहेत. विशेषतः सर्वांच्या आवडीचा संगीत कारंजा उद्घाटनापासून काही काळ चालल्यानंतर बंदच पडला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना याचा आनंद लुटता येत नाही. पालिका प्रशासनाकडून संगीत कारंजा दुर्लक्षित झाला आहे.

परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पहिल्या टप्प्यात जयंत एक्स्प्रेस नावाची झुकझुक गाडी बंद पडली. तेव्हापासून एकाच थांब्याला स्थिरावली आहे. तिचे रुळ गंजून गेले आहेत. त्यातच आता विजेचा खोळंबा असल्याने उद्यान दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंतच सुरू असते. त्यामुळे लाखो रुपयांच्या उत्पन्नाचा फटका बसला आहे. संगीत कारंजा बंद अवस्थेत असून, तेथील साठलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे बागेत येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी पालिका प्रशासनाने संगीत कारंजा आणि रेल्वे सुरू केल्यास पुन्हा एकदा उद्यानाच्या सौंदर्यात भर पडेल आणि उद्यान नव्याने मोकळा श्वास घेईल.