बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता उलथवून नवीन सरकार आले, तरी गेल्या काही महिन्यांपासून हिंदू मंदिरे, बुद्ध विहार आणि नागरिकांवर हल्ले वाढतच आहेत. सातत्याने हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळत असून, हिंदू समाज आक्रमक झाला आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करीत संताप व्यक्त करण्यात आला.
हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजित सुतार, शिवाजी शिंगारे, शिवाजी मोटे, नितीन काकडे, सोहम हुपरे, निळकंठ माने आदी उपस्थित होते.