पोलिसांनी विट्यातील अवैध धंद्यांवर वचक ठेवावा : आमदार सुहास बाबर

लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे. मी कोणते चुकीचे काम सांगणार नाही आणि कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही. पोलिसांनी अवैध धंद्यावर वचक ठेवावा असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले.येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आमदार म्हणून त्यांनी प्रथमच मतदासंघांतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाबर म्हणाले, शासन आणि प्रशासन ही राज्यकारभाराची दोन चाके असतात. कारभार सुरळीत चालवायचा असेल तर या दोन्ही चाकांची दिशा एकच असली पाहिजे आणि शेवटच्या घटकाची उन्नती साधणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचेही ध्येय असले पाहिजे.

मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे.बाबर म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला प्रशासकीय कामांची माहिती आहे. आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाच्या माझ्या विकासाच्या संकल्पना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी गतिमान व पारदर्शकपणे प्रशासनाने काम केले पाहिजे. तळमळीने काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहीन. सामान्य लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे असे काम झाले पाहिजे.आपल्याकडे आता पाणी आले आहे.

यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्यासह शासनाच्या सर्व खात्यांचे अधिकारी खानापूर, आटपाडी तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विटा, आटपाडी, खानापूर शहरांच्या पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.