सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुगणनेसमवेत आता जनावरांना ‘टॅग’ (बिल्ला) देखील लावण्यात येणार आहे. हा ‘टॅग’ केवळ मोठ्या जनावरांना लावण्यात येणार आहे. दुधाच्या अनुदानासाठी जनावरांना पशुपालकांनी ‘टॅग’ लावून घेतलेला आहे, मात्र ज्या पशुपालकांनी जनावरांच्या कानाला ‘टॅग’ लावलेला नाही, अशा सर्व जनावरांच्या कानाला पशुगणनेवेळी ‘टॅग’ लावण्यात येणार आहे.’राज्यातील २१ वी पंचवार्षिक पशुगणना २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यातही सध्या पशुगणना सुरू आहे. जिल्ह्यात पशुगणनेसाठी ग्रामीण भागासाठी १५५ प्रगणक व २४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत.
तसेच शहरी भागासाठी ४७ प्रगणक व १२ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. ही पशुगणना मोबाईल ॲपद्वारे करण्यात येत असून तीन महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे.जनावरांचा बिल्ला म्हणजे त्यांचे एक प्रकारचे आधारकार्ड आहे. भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कानाला ‘टॅग’ लावण्यात येतो, ज्यामध्ये १२ अंकी बारकोड असतो.
त्यात पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येतात, त्यात पशुधनाची सर्व प्रकारची माहिती ठेवली जाते. त्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाला उपलब्ध होते.