खानापूर घाटमाथ्यावर ऊसतोडीला गती

गेल्या काही दिवसापासून परिसरामध्ये कडक ऊन असल्यामुळे ऊसतोडीला गती आली आहे. कारखान्यांना ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. खानापूर घाटमाथ्यावर अनेक कारखान्यांच्या ऊसतोड करणाऱ्या टोळ्या दाखल झाल्याने ऊसतोड हंगाम जोमात सुरू आहे. अवकाळी पावसामुळे थांबलेल्या तोडण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारखान्यांना ऊस घालवण्याची धडपड शेतकऱ्यांमधून दिसून येत आहे.

दुष्काळाची दाहकता अनुभवलेल्या घाटमाथ्यावर गेल्या काही वर्षांपासून टेंभूचे पाणी आल्याने व परिसरात झालेल्या दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. परिसरातील सर्व तलाव भरलेले आहेत. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे खानापूर, सुलतानगादे, बेनापूर, करंजे, मोही, शेडगेवाडी, बलवडी (खा) या परिसरामध्ये ऊसक्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी या परिसरामध्ये कारखान्यांच्या ऊसतोड करणाऱ्या टोळ्या उशिरा दाखल झाल्याने ऊस घालवताना त्रास सहन करावा लागला होता. परिसरातील वाढते ऊसक्षेत्र लक्षात घेऊन जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील कारखान्यांच्या टोळ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र परिसरात अवकाळीने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात रुतू लागल्याने ऊसतोडी थांबल्या होत्या.