कांडी मशिनमध्ये गळ्यातील स्कार्फ अडकल्याने फास लागून सौ. शालन मारुती पवार (वय 62, रा. बाळनगर) या वृद्धेचा मृत्यू झाला. संग्राम चौक परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. दोन महिन्यांतील कांडी मशिनमध्ये सापडून महिलेच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.
संग्राम चौक परिसरात आखील इस्माईल खानापुरे यांचा फय्युम व्हिव्हींग वर्क्स नावाचा कारखाना आहे. त्याच्या पोटमाळ्यावर मशिनद्वारे कांड्या भरण्याचे काम चालते. आज पहाटे या ठिकाणी सौ. शालन पवार कामावर आल्या होत्या. थंडीपासून बचावासाठी त्यांनी स्कार्फ बांधला होता. काम करत असताना त्यांचा हा स्कार्फ कांडी मशिनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्फचा गळफास लागून सौ. पवार यांचा जागीच मृत्यू झाला. यंत्रमाग कारखान्यातील कामगार पोटमाळ्यावरील कांडी मशिनच्या ठिकाणी गेले असता ही घटना उघडकीस आली. सौ. पवार यांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले.