हेरले गावभाग फाट्यानजीक भरधाव तवेराची मोटरसायकलला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यामध्ये असणारे खड्डे तसेच अति वेगवान वाहन चालवणे, धूम्रपान यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात घडत आहेत.यामुळे अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागत आहे. असाच एक अपघात हेरले गावभाग फाट्यानजीक घडला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू देखील झालेला आहे. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कोल्हापूर सांगली महामार्गावर हेरले गावभाग फाट्या नजीक भरधाव वेगाने धावणाऱ्या तवेराने पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार हेरले येथील महमंद धोंडीबा खतीब वय 55 आणि राजेंद्र दत्तू माने वय 59 हे आपले शेतातील काम आटोपून घरी परतत होते. गावभाग फाट्याजवळ ते रस्ता ओलांडत असताना मिरजेकडून कोल्हापूरकडे भरधाव जाणाऱ्या तवेराने त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात मोहम्मद खतीब रस्त्यावर उडून पडले आणि त्यांच्या अंगावरून तवेरा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलवरील दुसरा प्रवासी राजेंद्र माने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक देताच तवेरा चालकांनी घटनास्थळावरून पालन केले आहे. महमंद खतीब यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर मोटरसायकलची स्थिती ही अत्यंत खराब झाली असून घटनास्थळी रक्ताचा थारोळा पाहायला मिळाला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बारगीर, आयुब पेंढारी, अफजल पठाण यांनी वाहनाचा पाठलाग करत हालोंडी गावच्या हद्दीतील टोल नाक्यावर अडवले.