नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून विठ्ठल चोपडे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु हा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटल्याने चोपडे यांनी पदाचा राजीनामा देत बंडखोरी केली. हे करत असताना त्यांनी पक्ष कार्यालयाचा ताबा मात्र स्वतःकडेच ठेवला. दरम्यानच्या काळामध्ये बाळासाहेब देशमुख यांचे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु राष्ट्रवादीचे कार्यालयामध्ये विठ्ठल चोपडे यांचे प्रचार कार्यालय उघडल्यामुळे देशमुख कार्यालयाकडे फिरकतात की नाही याबाबत चर्चा सुरू झालेल्या होत्या.
निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते विठ्ठल चोपडे यांचे सोबत असल्याचे दिसून आले तर नूतन शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्याकडे मात्र मोजकेच कार्यकर्ते असल्याचे निदर्शनास येत होते. सध्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागल्यामुळे कार्यकर्ते ही विभागलेलेचे जाणवत आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पक्षाला पुन्हा उभारी मिळवण्यासाठी विठ्ठल चोपडे यांची घरवापसी करून त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे.