सांगोला शहराचा पश्चिम भाग शेकापचा बालेकिल्ला आहे. तो तुम्ही सार्थ ठरविला आहे. तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, येत्या ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रमाणेच आपण समाजकारण करणार असून निवडणूक संपली आहे, आता सर्वांना सोबत घेऊन समाजकारण करणार असल्याचे नूतन आ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. बनकरमळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ तसेच क्रांतीज्योती नागरी सहकारी पतसंस्था व परिवार, माऊली प्रतिष्ठान व आर. ए. बनकर मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बनकर मळा येथील कार्यकर्त्यांनी माझा व आमच्या कुटुंबाचा जो सत्कार केला याबद्दल आभार व्यक्त करून तुम्ही जेवढे मताधिक्य दिले तेवढी झाडे लावत आहात हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपाने पत्नी रतनबाई देशमुख, डॉ. निकिता देशमुख, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, आर. ए बनकर, उत्तम बनकर, रमेश बनकर, गजानन बनकर, विजय राऊत, सुरेश माळी, भीमराव बनकर, सचिव सोमनाथ माळी, पांडुरंग बनकर, महादेव बनकर, सोमनाथ राऊत, सतीश माळी तसेच परिसरातील महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ६० वर्षे आबासाहेबांनी जो शांततेचा व सुसंस्कृतपणा जपला तोच विचार आपणास पुढे न्यायचा आहे. तुम्ही सांगितलेली कामे येणाऱ्या काळात निश्चित पूर्ण करू, असे सांगितले.