मनसे आणि शिवसेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भातील चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी युतीसंदर्भात कोणतंही अधिकृत विधान केलं नसलं, तरी सूचक विधानं केली आहेत. दरम्यान स्थानिक पातळ्यांवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी जाहीरपणे युतासाठी आवाहनही करत आहेत. त्यातच आज मुंबईत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते 25 जूनला एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई संबोधित करण्याची शक्यता आहे. दुपारी 12.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेचा मुद्दा इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियनने केलेला खोटारडेपणा आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे हा खोटारपडेपणा उघड करणार आहेत.

याआधी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने 18 जून रोजी एकत्र आले होते. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते.