खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये मंत्रिमंडळाचा दुष्काळ कायम; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर

सांगली जिल्ह्यात एकेकाळी पाच मंत्रिपदे होती. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्री पद महायुतीने दिले नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असूनही मंत्री पदापासून वगळण्यात आलेला आहे. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अपूर्ण राहिलेले सुहास बाबर यांच्या रूपाने देण्याची मागणी कार्यकर्ते करीत होते. जत विधानसभेचे आमदार आटपाडीचे सुपुत्र गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र महायुती सरकारने जिल्ह्यात एक सुद्धा आमदार मंत्रीपद दिले गेले नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खूपच निराशा दिसून आली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघाची जबाबदारी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे आहे. विविध विकास कामाबाबत मागील दोन वर्षे त्यांनी काम केले आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर आमदार सुहास भैया बाबर यांनी मतदारसंघात निधी कमी पडू दिलेला नाही. खानापूर आटपाडी मतदारसंघात एकही मंत्रीपद दिले नसल्याकारणाने मंत्रिमंडळ विस्तारानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजीचा सूर पाहण्यास मिळत आहे.