थंडीच्या धुक्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा २३ डिसेंबरचा मुहूर्त एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण ‘फ्लाय ९१’ या कंपनीने सोमवारी दिले.गोवा मुख्यालय असलेल्या फ्लाय ९१ या कंपनीने २३ डिसेंबरपासून गोवा ते सोलापूर, मुंबईत ते स सोलापूर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.१० डिसेंबरपासून तिकीट बुकिंग सुरू होईल, असे कंपनीने म्हटले होते. कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी केले.
डिसेंबर अखेर ते जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत धुक्याचे वातावरण असते. या धुक्यांमुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता पाहता २३ डिसेंबरचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. सोलापूर विमानतळ हे प्रवासी विमानांच्या सेवेसाठी नवीन विमानतळ आहे. या काळात नवीन विमानसेवा सुरू करताना काळजी घ्यावी लागते, असेही कंपनीने म्हटले आहे. विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा आवश्यक असल्याचे कंपनीने एअरपोर्ट अथॉरिटीला कळवले होते. विमानतळावरील सर्व अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे फ्लाय ९१ या कंपनीने म्हटले आहे.