मुंबईकरांना लवकरच एक नवे पर्यटनस्थळ मिळणार आहे. सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान मुंबईत उभारण्यात येत आहे. बोरिवलीमधील गोराई खाडीलगत हे उद्यान उभारण्यात येत असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे. कांदळवन उन्नत मार्ग हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असणार आहे. पर्याटकांना 700 मीटर मार्गावरुन थेट कांदळवनाची सफर घडणार आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर 26.97 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. गोराईबरोबरच दहिसर येथेही 30 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे.
सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईत उन्नत मार्ग साकारण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून 700 मीटर लांबी आणि रुंदी 2.4 मीटर आहे. तसंच, उन्नत मार्गाच्या मध्ये विश्नांतीस्थळ व आसन व्यवस्था असणार आहे.बोर्डवॉकदेखील तयार करण्यात आला असून या बोर्डवॉकवरुन पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. गोराई खाडीतून पर्यटकांना कांदळवनाची सफर होणार आहे.
दरम्यान, कांदळवनाचा ऱ्हास होऊ नये म्हणून 2012मध्ये कांदळवन कक्ष सुरू करण्यात आला. 2013 मध्ये सरकारी जागांवरील कांदळवनांचे नाव आरक्षित वनेऐवजी राखीव वने असे करण्यात आले. कांदळवनांवरील अतिक्रमणे, प्रदूषण, औद्योगिकीकरण प्रदूषण या बाबी लक्षात घेऊन कांदळवन कक्ष तयार करण्यात आला आहे. तसंच, कांदळवन हे पूरपरस्थिती रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे.
