2030 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या होस्टिंगबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. भारताने अहमदाबादमध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या होस्टिंगची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यात अधिकृतपणे आपला दावा सुद्धा मांडला होता. असं वाटत होतं की अहमदाबाद कॉमनवेल्थ गेम्सच्या होस्टिंगसाठीचा एकटा दावेदार आहे, पण शेवटच्या क्षणी यात मोठा ट्विस्ट आलाय. त्यामुळे आता भारत या शर्यतीत एकटा नाही.
भारताला आता कॉमनवेल्थ गेम्सच्या होस्टिंगसाठी नायजीरियाकडून सुद्धा मोठी स्पर्धा आहे. आफ्रिकेचा देश असलेल्या नायजीरियाने सुद्धा 31 ऑगस्ट रोजी शेवटच्या क्षणी या मल्टी-स्पोर्टिंग इव्हेंटच्या होस्टिंगसाठी आपला औपचारिक दावा केला आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ने शुक्रवारी 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अंतिम बोली कागदपत्रे सादर केल्याची घोषणा केल्यानंतर, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची प्रशासकीय संस्था असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेने सोमवारी नायजेरियाने औपचारिक बोली सादर केल्याची पुष्टी केली. कॅनडाने सुद्धा कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या होस्टिंगसाठी दावा केला होता, पण त्यानंतर बजेटमुळे त्यांनी यातून माघार घेतली.
कॉमनवेल्थ गेम्सने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं, ‘भारत आणि नायजेरियाने 31 ऑगस्ट 2025 या अंतिम मुदतीपर्यंत 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी औपचारिक प्रस्ताव सादर केले आहेत’. दोन्ही प्रस्तावांचे मूल्यांकन आता राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन आयोगाकडून केले जाईल. सप्टेंबरच्या अखेरीस लंडनमध्ये होणाऱ्या बैठकीत ‘भारत आणि नायजेरियांचे वैयक्तिक सादरीकरण देखील ऐकेल’.मूल्यांकन आयोग त्यांचा रिपोर्ट कॉमनवेल्थ गेम्स कार्यकारी बोर्डाला देईल. जे नोव्हेंबरच्या अखेरीस स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या आम सभेत मंजुरीसाठी ७४ सदस्य राष्ट्रे आणि प्रदेशांना यजमानपदाची शिफारस करतील.
मूल्यांकन आयोगाचे अध्यक्ष कॉमनवेल्थ गेम्सच्या उपाध्यक्षा सँड्रा ऑसबोर्न आहेत. या आयोगात कॉमनवेल्थ गेम्स कार्यकारी मंडळाच्या सदस्या हेलेन फिलिप्स, कॉमनवेल्थ गेम्स खेळाडू सल्लागार आयोगाचे अध्यक्ष ब्रेंडन विल्यम्स यांचा समावेश आहे. ग्लासगो 2026 ऑर्गनायझिंग कंपनीचे उपाध्यक्ष इयान रीड आणि असोसिएशन ऑफ समर ऑलिंपिक इंटरनॅशनल फेडरेशन्स चे माजी कार्यकारी संचालक अँड्र्यू रायन यांचा देखील समावेश आहे.
