शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार, हे सरकारने जाहीर करावे. या मागणीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते नागपूर महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे रोखून धरण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आहे.
बाधित शेतकऱ्यांची बैठक दि. ७ डिसेंबर रोजी पार पडली. त्या बैठकीत महामार्ग रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी बदल करून महामार्गाचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. काही ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यात येतील, असेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बैठक घेऊन दि. १८ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.