गेल्या काही दिवसापासून भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, त्यांना मंत्रिपद मिळेलेले नाही.पडळकर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली होती.
पडळकर काही दिवसापासून माध्यमांसमोरही आले नव्हते. दरम्यान, आज ते हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज नाही असं स्पष्ट केलं. मंत्रिपद मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना होती.
मी आजही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. मी नाराज नाही, मी यापुढेही काम करत राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. पण पक्षाने विचार करुनच निर्णय घेतला असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा ही माझी विनंती आहे, असंही पडळकर म्हणाले. मारकडवाडीमुळे आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही असं काही वाटत नाही.
आमदार पडळकर म्हणाले, छगन भुजबळ वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची बाजू घेतली होती. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून समाजातील काही मंडळी नाराज आहेत. पण, ते भाजपामधील नाहीत त्यामुळे मी काही बोलू शकत नाही.
