वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथे इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याच्या वादातून पाचजणांनी कोयता व पारळीने दोघा तरुणांवर खुनीहल्ला केल्याप्रकरणी पाचजणांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हा खुुनीहल्ल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. या हल्ल्यात विजय शंकर साळुंखे (वय 27) व रोहन दादासोा मोरे (21, दोघे रा. किल्लेमच्छिंद्रगड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्याप्रकरणी श्रेयस दत्तात्रय बाकले (19), तेजस सुरेश बाकले (24), आदित्य विठ्ठल पाटील (19), संग्राम राजाराम बाकले (चौघे रा. जुळेवाडी, ता. कराड), संग्राम विश्वास मोहिते (19, रा. किल्लेमच्छिंद्रगड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रोहन मोरे व त्याचा मित्र श्रेयश यांच्यात फोनवर वादावादी झाली होती. त्यानंतर 3 वाजण्याच्या सुमारास विजय व रोहन हे पानटपरीजवळ असताना संशयित श्रेयस, आदित्य, संग्राम, तेजस, संग्राम बाकले हे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले.
त्यांनी पारळी, कोयत्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात विजय व रोहित हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.